राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमंत्रण स्विकारू नये – काँग्रेस  

126

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संघाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. यावर काँग्रेसमध्ये खलबते सुरु झाली आहेत.  आज (गुरुवारी) काँग्रेस कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीतही संघाचे आमंत्रण स्विकारू नये, असा सल्ला राहुल गांधींना देण्यात आला. 

नक्षलवादी समर्थक असल्याच्या आरोपाखाली देशभरातील डाव्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावर राहुल गांधी यांनी संघावर टीका केली होती. संघ ही देशभरातील एकमेव स्वयंसेवी संस्था आहे, असे राहुल गांधी म्हटले होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या विधानात आणि वर्तवणूकीत कुठलाही विरोधाभास दिसता कामा नये, यासाठीच त्यांनी संघाच्या कोणत्याही व्यासपीठावर जाऊ नये, असा सूर या बैठकीत निघाला.

दरम्यान, संघ हा काँग्रेसचा वैचारिक विरोधक आहे. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले होते. तसेच संघाची विचारधारा ही देशासाठी आणि दलितांसाठी विषासारखी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निवडणुकांना लक्ष ठेऊन हे आमंत्रण पाठवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.