राहुल गांधींच्या मातोश्री परदेशी, मायावती पंतप्रधान होऊ शकतात – बसपा

86

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मातोश्री परदेशी असल्याने  राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, असे सांगत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा  मायावती पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत. मायावतीच मोदींना टक्कर देऊ शकतात, असे पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांना एकत्र आणून महाआघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे.

बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव पुढे केले. आता पंतप्रधानपदावर मायावतींनी विराजमान होण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय राजकारणात मायावतींनी छाप पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहांना फक्त ‘दबंग’ मायावतीच रोखू शकतात, असे जयप्रकाश सिंह यांनी म्हटले आहे.

मायावती फक्त दलित समाजाच्या नेत्या नाहीत, त्यांना समाजातील प्रत्येक वर्गाचा पाठिंबा आहे. राहुल गांधी हे त्यांच्या आईसारखेच दिसतात. त्यांची आई परदेशी असल्याने राहुल गांधी  पंतप्रधान होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मायावतींचा तळागाळातील जनतेशी संपर्क असून त्या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीदेखील होत्या. त्यामुळे पंतप्रधानपदावर काम करण्याची क्षमता मायावतींमध्येच आहे, असेही त्यांनी सांगितले.