राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या 20 वर्षांच्या लढ्याला यश; 469 कंत्राटी कामगारांना मिळाले 39 कोटी रुपये राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांची माहिती

19

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करणा-या 469 कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कायद्यानुसार देय असलेल्या फरकाची आणि व्याजाची रक्कम देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार महापालिकेने 469 कंत्राटी कर्मचा-यांच्या खात्यावर 39 कोटी रुपये रक्कम जमा केल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली. संघटनेच्या 20 वर्षाच्या लढ्याला यश आले आहे. या ऐतिहासिक निकालाचा देशातील करोडो कंत्राटी कामगारांना फायदा होणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
कासारवाडी येथे आज (मंगळवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत भोसले यांनी माहिती दिली. यावेळी अॅड. सुशील मंचरकर, दिपक पाटील, दिनेश पाटील, अहमद खान, एफ.एम.चव्हाण, मधुकर काटे, विठ्ठल ओझरकर, संजय साळुंखे आदी उपस्थित होते.

भोसले म्हणाले, महापालिका झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन स्थापत्य, आरोग्य तसेच वैद्यकीय विभागातील शौचालय, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील स्वच्छतेचे काम ठेकेदारी पद्धतीने सुलभ इंटरनॅशनल, विशाल एंटरप्रायझेस आणि एम. पी. एंटरप्रायझेस या संस्थांना जानेवारी 1998 ते सप्टेंबर 2004 या कालावधीत दिले होते. या तिघांकडे 572 कर्मचारी काम करत होते. राष्ट्रीय श्रमिक आघाडीने या कामगारांना समान काम-समान वेतन देण्याची मागणी महापालिकेकडे केली. परंतु, पालिकेने ती मान्य केली नाही. त्यामुळे संघटनेने यासंदर्भात सन 2001 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सन 2004 मध्ये या याचिकेवर निर्णय झाला. कामगारांचे वेतन देण्याची प्राथमिक जबाबदारी ठेकेदारांची असून ही जबाबदारी पार पाडण्यास ठेकेदार असमर्थ ठरल्यास कामगारांची देयके महापालिकेने द्यावीत, असे आदेश न्यायालयाने दिले. पण, पालिकेने त्याची अमंलबजावणी केली नाही. त्याउलट या निर्णयाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवून ते नामंजूर केले, असे भोसले यांनी सांगितले.

न्यायालयाचा अवमान केला म्हणून संघटनेने 18 नोव्हेंबर 2016 रोजी आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल केली. त्यावर 2018 पर्यंत सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान पालिकेने कर्मचा-यांची पडताळणी होत नाही, असे न्यायालयात सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी ‘रेकॉर्ड’ तपासले. संघटनेने दिलेल्या कामगारांच्या यादीची पडताळणी केली. त्यामध्ये यादीतील 469 कामगार कामावर असल्याचे आढळून आले. या 469 कामगारांना समान काम समान वेतनाच्या निर्णयानुसार व्याजासह फरकाची रक्क अदा करावी असा आदेश त्यांनी दिला. तो उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले. त्याची अंमलबजावणी आज झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने 469 पैकी 450 कामगारांच्या खात्यावर 38 कोटी रुपये जमा केले आहेत, असे भोसले यांनी सांगितले.

काही कर्मचारी मृत झाले आहेत. त्यांच्या वारसदारांच्या नावाने धनादेश बदलून घेण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित कामगारांच्या वारसदारांच्या खात्यावर पैसै जमा होतील, असे भोसले यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ विधिज्ञ संजय हेगडे, प्रशांत शुक्ला, उच्च न्यायालयात राजीव पाटील, विशाल कोळेकर यांनी काम पाहिले. 2001 साली मुख्य दावा अॅड. नितीन कुलकर्णी यांनी दाखल केला होता.
20 वर्षांच्या लढाईला यश – भोसले
राष्ट्रीय श्रमिक आघाडी 20 वर्ष कामगारांची लढाई लढली. त्याला मोठे यश मिळाले आहे. पालिकेच्या 469 सफाई कर्मचा-यांना न्याय मिळाला आहे. एका कामगाराला 9 ते 16 लाखांपर्यंत फरकाची रक्कम मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी रक्कम वसूल होत आहे. पालिकेने 2004 मध्येच न्यायालयाच्या आदेशाची अमंलबजावणी करत फरकाची रक्कम दिली असती. तर, आज पालिकेचे कोट्यवधी रुपये वाचले असते. 20 वर्षांच्या लढाईत अनेक संकटे आली. पण, डगमगलो नाही. कंत्राटी कर्मचा-यांना न्याय मिळवून दिला. संघटना स्थापन केल्याचे आज ख-याअर्थाने चिज झाले आहे. याचे आत्मिक समाधन आहे. कामगार कायदे बदलत असताना आणि कामगार वर्गामध्ये भितीचे वातावरण असताना कंत्राटी कामगारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे यशवंत भोसले म्हणाले.

WhatsAppShare