राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणेवर चोरट्यांचा हल्ला; जखमी झाल्याने राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार

132

नाशिक, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी मंगळवारी रात्री प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. तसेच निखिलवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल हा मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोल पंपासमोर चोरट्यांनी त्याला अडवले. मात्र, त्याच्याकडे काहीही मिळाले नाही. याच रागातून त्यांनी त्याच्यावर कोयता आणि चाकूने हल्ला केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे.