राष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी

1232

पुणे, दि. १० (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या  पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व इतर आत्महत्येला जबाबदार असल्याचे लिहिले होते. यावरुन मानकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक मानकर यांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात,  मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  मात्र त्यांना जामीन मिळाला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० दिवसांच्या आत पोलिसांसमारे हजर राहण्याचा आदेश दिले होते.

यामुळे नाईलाजाने मानकर पोलिसांसमोर अहजर झाले पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत नेण्यात आले़. मात्र त्याच रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले़  त्यामुळे त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. आज (शुक्रवार) पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.