राष्ट्रवादीमुळे काँग्रेसने निष्ठावंत नेता गमावला; बुधवारी हर्षवर्धन पाटील करणार भाजपात प्रवेश

408

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे बुधवारी (दि.११) दुपारी तीनच्या सुमारास मुंबई येथे मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

यामुळे इंदापूर तालुक्यतील काँग्रेस विसर्जित होणार असून पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

पाटील यांनी गेल्या आठवड्यामध्ये बुधवार (दि.४) रोजी पुढील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी  जनसंकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये जनतेने पाटील यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला होता. मेळाव्यानंतर दोन दिवस नॉट रिचेबल  असलेले पाटील यांनी सुजय विखे आणि नंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते इंदापूर तालुक्यामध्ये आल्यानंतर पुढील दिशेबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी वेट अॅन्ड वॉच असे सांगितले.

आता या राजकीय लपंडावाला पुर्णविराम लागला असून  इंदापूर तालुक्यातील सध्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह पाटील हे बुधवारी मुंबईत मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकसभेत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचे प्रामाणिक काम केले होते. तसेच त्यांना राष्ट्रवादीने इंदापूरचा शब्द दिला होता. मात्र अजित पवारांसोबत असलेले राजकीय वैर आणि राष्ट्रवादीच्या घातकी राजकारणाला शह देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसने एक निष्ठावंत नेता गमावल्याचे बोलले जात आहे.

WhatsAppShare