राष्ट्रवादीतील सडके आंबे भाजपमध्ये आणू नका – गिरीश बापट

21

शिवसेना हा भाजपचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते भाजपात आले तर त्यांना येऊ द्या. मात्र, एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून आपले आंबे सडवू नका, अशी उपरोधिक टीका  पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.  

मावळ तालुक्यातील कार्ला येथील अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बापट बोलत होते.

यावेळी बापट म्हणाले की, भाजपमध्ये अजून कोणी प्रवेश करणार असेल तर त्यांचाही प्रवेश करून घ्या. मात्र, राष्ट्रवादीचे कोणी आणू नका. तसेही राष्ट्रवादीत कोणी शिल्लक राहिलेले नाही, पळापळ झाली आहे. राष्ट्रवादीतील सगळे आंबे सडके-किडके  झाले आहेत. त्यामुळे  आमचेच सगळे आंबे सडायचे. त्यामुळे त्यांना जे काय करायचेय ते करु द्या. ‘हल्लाबोल’सारख्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील जनता फसणार नाही. जनतेला कोण काम करत आहे, हे माहित आहे, असे बापट म्हणाले.