राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना राज्यसभा उपसभापतीपदाची उमेदवारी ?

39

पुणे, दि. १७ (पीसीबी) – राज्यसभा उपसभापतीपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. पावसाळी अधिवेशनापूर्वी रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी १२३ मतांची गरज आहे. भाजप ६९ जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. मित्र पक्ष आणि काही अपक्षांच्या मदतीने ११५ पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. मात्र, १३ खासदार असलेली एआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करेल हे अजून अस्पष्ट आहे.

उपसभापतीपदाची निवडणूक ही विरोधकांच्या एकीची परीक्षा घेणारी आहे. भाजपला नमवण्याची संधी असल्याने सगळे विरोधक राज्यसभेत एकत्र येणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही विजयाची खात्री नसल्याने भाजप आपला उमेदवार देत नाही. मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी भाजपही सर्वसहमतीने उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करत आहे. तर एनडीएकडून अकाली दलच्या नरेश गुजराल यांचेही नांव चर्चेत आहे.