राष्ट्रवादीच्या कार्यकारणीची बैठक, अजितदादांचा फोटो गायब..

274

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत पाच राज्यांच्या निवडणुका, महागाईसह आठ मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, या बैठकीतील पोस्टरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेली महिनाभर अजित पवार यांच्या मौनाबाबत वनेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

गेल्या आठवड्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळेही या बैठकीला महत्त्व आलं आहे. या बैठकीत काय चर्चा करण्यात येणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाईल. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत यूपीए तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर चर्चा केली जाईल का ? असे विचारले जात आहे. त्यावर या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विशेष निमंत्रित आणि जे मंत्री आहेत त्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीत यूपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे.
दरम्यान, दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालयात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. पोस्टरवर महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांचे फोटो होते. मात्र अजित पवार यांचा एकाही पोस्टरवर फोटो नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका, राष्ट्रीय अधिवेशनाची तारीख, स्थळ आणि अजेंडा निश्चित करण्यात येणार, राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यसमितीच्या सदस्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केले जाणार, संमेलनात विचारात घेतले जाणारे ठराव तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नियुक्त केली जाणार, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा आदी राज्यांच्या विधानसभांच्या आगामी निवडणुका, विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलावीत., इंधन आणि गॅसच्या किमतीत अनियंत्रित वाढ, अध्यक्षांनी परवानगी दिलेली इतर कोणतीही बाब आदी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.