राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकले; मावळ मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन

6009

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. वाघेरे हे मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तीव्र इच्छुक आहेत. पक्षाकडेदेखील वाघेरे वगळता अन्य दुसरा ताकदीचा उमेदवार नसल्याचे चित्र आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारा प्रतिस्पर्धी उमेदवार नसणे तसेच पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगली प्रतिमा असणे वाघेरे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. शांत आणि संयमी नेतृत्व असणारे वाघेरे हेच आगामी निवडणुकीत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. परंतु, ऐनवेळी खचखाऊ भूमिका घेण्याची वाघेरे यांची राजकीय सवय आहे. गेल्यावेळी लोकसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळत असताना त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. यंदा ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

संजोग वाघेरे हे गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद सांभाळत आहेत. पक्षाने महापालिकेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविली. परंतु, भाजपच्या लाटेत वाघेरे यांना पक्षाचा बालेकिल्ला शाबूत ठेवता आले नाही. तरीही राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील तब्बल २७ नगरसेवक हे चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीची राजकीय ताकद अजूनही शाबूत असल्याचे हे संकेत आहेत. हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. आगामी लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत. मुदतपूर्व म्हणजे डिसेंबर महिन्यात लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मुदतपूर्व निवडणूक न झाल्यास लोकसभा निवडणूक अवघ्या सात महिन्यावर येऊन ठेपली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त करून मावळ लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. संपूर्ण चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून वाघेरे यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकल्याचे संकेत दिले आहेत. मावळ मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे वाघेरे वगळता दुसरा उमेदवार नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा दावा होऊ शकणार नाही. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष योगेश बहल यांना पक्षातील स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. बहल यांना स्थानिकांचा किती विरोध आहे, हे विरोधी पक्षनेतेपदावरून उघडपणे समोर आले. परिणामी बहलांना राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी देणे पक्षाला परवडणारे नाही. ज्येष्ठ नेते आझम पानसरे हेदेखील आता राष्ट्रवादीत नाहीत. ते आता भाजपमध्ये गेले आहेत.

गेल्यावेळी राष्ट्रवादीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु, ते मुंबईचे असल्यामुळे त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला. यंदा ती चूक पक्षाकडून पुन्हा होईल, असे वाटत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हेच एकमेव उमेदवार असल्याचे स्पष्ट होते. वाघेरे यांनी गेल्यावेळीच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. पिंपरी-चिंचवडच्या बाहेर माथेरानमध्ये जाऊन तेथे महोत्सव भरवून त्यांनी लोकसभेचे आपणही उमेदवार असल्याचे दाखविले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर ती संजोग वाघेरे यांना पक्षाने देऊही केली होती. परंतु, त्यांनी ऐनवेळी कचखाऊ भूमिका घेत पक्षाच्या एकसंधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राष्ट्रवादीला बाहेरचा उमेदवार आयात करावा लागला. अन्यथा संजोग वाघेरे यांनी गेल्यावेळीच लोकसभेचा गुलाल उधळला असता, असे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते.

आता पुन्हा एकदा संजोग वाघेरे यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकले आहे. वाघेरे यांचे शांत आणि संयमी नेतृत्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावणारे आहे. त्यांनी पक्षात काम करत असताना कुणालाही उपद्रव होईल, असे काम केलेले नाही. बालेकिल्ल्यातच पक्षाला लोकसभा, विधानसभा नंतर महापालिका निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असताना वाघेरे यांनी शांतपणे परिस्थिती हाताळत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण ठेवले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात वारंवार रस्त्यांवर उतरून विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचा आवाज बुलंद ठेवला आहे. गावकी-भावकीच्या राजकारणात वाघेरे यांना मानाचे स्थान आहे. तसेच मावळ मतदारसंघात त्यांचा पाहुण्यांचा गोतावळाही मोठा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळ मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून वाघेरे यांना पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे. शहराच्या राजकीय वर्तुळातही मावळ मतदारसंघात वाघेरे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. परंतु, वाघेरे यांची ऐनवेळी खचखाऊ भूमिका घेण्याची सवय आहे. त्यामुळे यंदा ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.