राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणात निवृत्त एसीपी मोहन विधाते पीआय मुजावर यांची चौकशी होणार

269

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खूनप्रकरणी निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन विधाते आणि पिंपरी पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. ए. मुजावर यांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अधिकारी दोषी अढळल्यास कोणती कारवाई करणार याचा अहवाल ११ जुलैपर्यंत सादर करावा, असेही आदेश उच्च न्यायालयाने पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

राष्‌ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा ३ सप्टेंबर २०१५ ला खून झाला होता. याप्रकरणी बाबु उर्फ सुर्योदय शेखर शेट्टी यांना अटक करण्यात आली होती. मात्र टेकावडे खून प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पिंपरी-चिंचवडचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन विधाते आणि पिंपरी पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. ए. मुजावर यांनी स्थानिक राजकारण्यांच्या सांगण्यावरुन वेळोवेळी अटक करुन तब्बल ६० दिवस तुरुंगवास भोगण्यास भाग पाडले, असे शेट्टी यांनी याचिकेत म्हटले होते.

या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि रेवती मोरे-डोरे यांच्या खंडपीठापुढे २० जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने माजी नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणात निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन विधाते आणि पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. ए. मुजावर यांची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसेच हे अधिकारी दोषी अढळल्यास कोणती कारवाई करणार याचा ११ जुलैपर्यंत सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. याबाबत बाबू शेट्टी, ॲड. निलेश कदम आणि अनिल आसवाणी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.