राष्ट्रवादीचे पिंपरी महापालिकेत आत्मप्रौढी नाटकी आंदोलन; पक्षासाठी महिलांपेक्षा विरोधी पक्षनेत्यांचा आत्मसन्मान महत्त्वाचा

598

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – दहीहंडी उत्सवाच्या वेळी आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही देणे-घेणे नसल्याचे गुरूवारी (दि. ६) स्पष्ट झाले. महिलांच्या सन्मानापेक्षा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या अज्ञानाबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलेले विधान राष्ट्रवादीला महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी आयुक्तांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. राष्ट्रवादीने आत्मप्रौढीसाठी केलेल्या या नौटंकी आंदोलनाचा भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी सभागृहातच बुरखा फाडला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक काळ्या फिती लावून हजर होते. आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काळ्या फिती लावल्याचा समज सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झाला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची राष्ट्रवादीला काळजी असल्याचे कौतुकही इतर पक्षाच्या नगरसेवकांनी केले. सभेला सुरूवात होताच राष्ट्रवादीच्या एक-दोन नगरसेविकांनी आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावले नसल्याचे समोर आले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकरांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या अज्ञानाबाबत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखाद्या नगरसेवकांविषयी असे बोलणे योग्य नसल्याचे सांगत त्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकजूट दाखवण्याची त्यांनी गरज व्यक्त केली. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही हा मुद्दा उपस्थित करत आयुक्तांना खडे बोल सुनावले. याप्रकरणी आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर आयुक्तांनीही मोठ्या मनाने माफी मागितली. त्यानंतर दत्ता साने पुन्हा उभे राहिले आणि आयुक्तांनी माफी मागावी, अशी आमची अपेक्षा नसल्याचे सांगत राष्ट्रवादीची गोंधळाची परिस्थिती प्रकट केली.

एवढ्यावरच न थांबता आयुक्तांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक काळ्या फिती लावून सभागृहात आल्याचे दत्ता साने यांनी स्पष्ट केले. त्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीच्या या आत्मप्रौढी नाटकी आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला. आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना असताना त्याबाबत काहीही देणे-घेणे नसल्याचे राष्ट्रवादीने आज सिद्ध केले आहे. आयुक्तांनी विरोधी पक्षनेत्यांबाबत केलेले वक्तव्य राष्ट्रवादीला महत्त्वाचे वाटते. त्यासाठी काळ्या फिती लावून निषेधही केला जातो. परंतु, आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य राष्ट्रवादीला महत्त्वाचे वाटत नाही. राष्ट्रवादीचे हे आत्मप्रौढीचे नाटकी आंदोलन असून, दुटप्पी राजकारण असल्याची टिका त्यांनी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी आमदार राम कदम यांचाही निषेध करण्याच्या उद्देशाने काळ्या फिती लावून आल्याचे सांगत सारसारव करण्याचा प्रयत्न केला.