राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खड्ड्यांसोबत सेल्फी

383

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांमध्ये हरवले आहे. राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर ते मुंबई दिवसा प्रवास करून स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी महामार्गावरील खड्डे पहावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे. तसेच त्यांनी महामार्गावरील खड्ड्यासोबत सेल्फी काढून तो मंत्री पाटील यांना पाठविला आहे.

नगरसेवक नाना काटे म्हणाले, “राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रात्रीचा दौरा करुन कोकणातील लोकांना वेड्यात काढले, तसे पुणेकरांना काढता येणार नाही. मुंबईला जाताना पुणे मार्गाने जावे लागते. त्यामुळे मंत्री पाटील यांचा येड घेऊन पेडगावला जाण्याचा स्वभाव पुणेकरांपुढे चालणार नाही. रस्त्यांवरी खड्डे बुजवण्यासाठी तारीख पे तारीख देऊन लोकांना किती दिवस वेड्यात काढणार एक दिवस सत्ताधाऱ्यांना जनताच धडा शिकवेल.

बांधकाममंत्री पाटील यांनी मुंबई–गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या मार्गाची नुकतीच पाहणी केली. परंतु रात्रीच्या वेळी ही पाहणी केल्याने रस्त्यावरील खड्डे त्यांच्या निदर्शनास आले नाहीत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांनी रात्रीच्या वेळी रस्त्यांची पाहणी करणे म्हणजे बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाला पाठिंबा देण्यासारखे आहे. मुंबई-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाची अवस्थाही मुंबई-गोवा महामार्गासारखीच झाली आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांनी रस्ते रात्री पाहण्याची पुनरावृत्ती न करता कोल्हापूर-मुंबई रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी दिवसा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”