राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर यांच्यावर महिन्याभरात तिसरा गुन्हा

1377

पुणे, दि. ३ (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा माजी महापौर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या महिन्याभरात त्यांच्या विरोधात आता तिसरा फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अदिती माधव दिक्षित (रा. एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून दिपक मानकरसह, साधना जयवंत वर्तक (रा. स्नेहा पॅराडाईज, पौड रोड), उमेश सुभाष कोठावदे – वाणी (रा. फ्लॅट नं.७, पृथवी विनायक कॉलनी, पुणे), वसुधा एंटरप्राईजेस (१०२, झेनिथ कॉम्पलेक्स, कृषी भवनच्या समोर, शिवाजीनगर .यांच्या विरोधात ) यांच्याविरोधात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिक्षित यांचा मालकी हिश्याची, वहिवाटीचा लोहगाव आणि विमाननगर येथील जमिन मिळकतीचा खोटा विकसन करारनामा आरोपींनी २३ जून २००४ मध्ये तयार केला होता. तो दस्त खोटा आहे असे माहिती असताना देखील आरोपींनी त्याचा विविध सरकारी कार्यालयांमध्ये उपयोग केला. तसेच त्यामधील ठरलेला मोबदला त्यांनी दिक्षित यांना न देता त्यांची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, कोथरुड आणि हडपसर पोलीस ठाण्यातनंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मानकरांविरोधात दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.