राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहुणचारासाठी घरपोच सेवाही देतील; रुपाली चाकणकरांचा इशारा

156

पुणे, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात सोशल मीडियावर अश्लील किंवा बेताल  विधान कराल, तर कायदेशीर गुन्हा दाखल करूच. त्यासोबत  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहुणचारासाठी  घरपोच सेवाही देतील, असा धमकीवजा  इशारा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपला व्हिडीओ अपलोड केला आहे.  यात त्या म्हणाल्या आहेत की, या पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे  तसेच  पक्षाच्या कोणत्याही नेत्यांबद्दल अश्लील किंव्हा बेताल वक्तव्य कराल तर कायदेशीर गुन्हा दाखल करूच पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहुणचारासाठी घरपोच सेवा देऊन विचारपूस देखील करतील याचीही दखल घ्यावी. ही माहितीसाठी एक झलक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही महिला समाजकारण, राजकारण किंवा इतर प्रत्येक क्षेञात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत असताना कर्तृत्व आणि नेतृत्व पणाला लावत असतो, याचा अर्थ आमच्यावर किळसवाणी टीका करावी, याचा अधिकार दिला कोणी या विकृत मानसिकतेला?  असा सवालही त्यांनी केला. तसेच समाजाची ही विकृती आजच्या तरूणाईची माथी भडकवतात. समाजाला लागलेली ही कीड नाहीशी व्हावी, यासाठी येथून मागे देखील अनेक वेळा कायदेशीर रित्या आम्ही मार्ग अवलंबत आहोत पण आता हे शांत बसणे अशक्य होत आहे. कमजोर कधीच नव्हतो पण संस्कार बरोबर घेऊन वाटचाल करतोय म्हणून विचारांनी लढत होतो,  असेही त्यांनी म्हटले आहे.