राष्ट्रवादीची वाटचाल स्वबळाच्या दिशेने

54

मुंबई, दि.८ (पीसीबी) : काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मोठं विधान केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आगाडी करणार नाही, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही स्वबळाच्या मूडमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले 114 उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हे विधान केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

त्या ठिकाणी ओबीसी उमेदवारच देऊ –
यावेळी मलिक यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ओबीसी आरक्षणाबाबतचा डेटा वेळेत मिळाला नाही आणि निवडणुका लागल्या तरी आम्ही ओबीसींना पूर्ण न्याय देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

पराभूत उमेदवारांनी मांडली कैफियत –
2019च्या निवडणुकीत 114 उमेदवारांना तिकीट दिलं होतं. त्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार, मंत्रीही उपस्थित होते. यावेळी एकूण 55 लोकांनी आपली मते मांडली. मतदारसंघातील परिस्थिती, तिथले प्रश्न आदी मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. या बैठकीत ज्या सूचना मांडण्यात आल्या आहेत. त्याची नोंद मंत्र्यांनी घेतली आहे. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे, असं मलिक म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी?
दरम्यान, तीन वर्षानंतर विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संघासह पराभूत झालेल्या विधानसभेच्या जागांवरही राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 114 जागा आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीने या 114 मतदारसंघावरच अधिक फोकस करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. या 114 मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पवारांनी आज जाणून घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीने मिशन 114 हाती घेतल्याचं बोललं जात आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. आजची बैठक सुद्धा मतदारसंघातील मोर्चेबांधणीचा भाग असल्याचंच राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे.

WhatsAppShare