राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी शरद पवार मैदानात

119

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती कायम असून ती गळती रोखण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला  आहे.  पवार पुढील आठवड्यापासून राज्यव्यापी दौरा करून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा नेमका तपशील अजून जाहीर झालेला नाही.

पक्षाला संकटातून बाहेर काढण्यासाठी समर्थ नेता पक्षात नसल्याने स्वत: पवारांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. जगजितसिंह राणा, सचिन अहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, अवधुत तटकरे आणि भास्कर जाधव आदी नेत्यांनी पवारांची साथ सोडून शिवसेना आणि भाजपचा रस्ता धरला आहे.  तर, साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचाही शनिवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश  होत आहे.  हा धक्का पक्षाला चांगलाच जिव्हारी लागला आहे.

दरम्यान, नेत्यांच्या भाजप-शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वावर प्रश्न निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला सावरणेही कठीण झाले आहे.  त्यामुळे  शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे पक्षाला उभारी मिळणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.