राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना…

71

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी दररोज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर, आघाडीतील नेत्यांवर हल्लाबोल करण्याचा सपाटा लावला होता. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत एक बाजू लावून धरली होती. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या या गदारोळात आता गेले काही दिवस दररोज पत्रकार परिषदा घेत नवाब मलिक यांनी शड्डू ठोकले आहेत. हिवाळी अधिवेशनात काही माहिती समोर आणणार आहे की ज्यामुळे भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा रहाणार नाही असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी भाजपावर केला.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी टाळले आहे. “ते दिवसभर काहीतरी बोलत असतात, आता सध्या त्यांना दुसरं कामंही नाहीये, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही ” असं सांगत मलिक यांनी केलेल्या आरोपांना महत्व देत नसल्याचं एक प्रकारे फडणवीस यांनी दाखवलं. तर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत या मलिक यांच्या आरोपांवर मात्र कोणाचं नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली आहे. “राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्याच्यामुळे कोण कोणाचा पोपट आहे….तुमच्या करता हे महत्त्वाचं असेल आमच्याकरता नाही ” अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूर इथे विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. तेव्हा अधिवेशनपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्योरोपांचे हे सत्र असंच सुरु राहणार हे दिसत आहे.

WhatsAppShare