पोलीसात तक्रार केली म्हणून एका आरोपीने तक्रारदाराच्या पत्नीला तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देऊन तीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ११) रात्री अकराच्या सुमारास रावेत येथे घडली.

या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन रामचंद्र शिंदे (रा. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २९ वर्षीय महिला या रावेत येथे आपल्या पतीसोबत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीने सचिन विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन सचिन बुधवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरी गेला. तेथे त्याने ‘तुझ्या नवऱ्याने माझ्याविरोधात दिलेली तक्रार मागे घ्यायला सांग, नाहीतर त्याचे काही खरे नाही’, अशी धमकी महिलेला दिली. तसेच तीला धक्काबुक्की करुन तीचा विनयभंग केला. त्यामुळे महिलेने तात्काळ देहूरोड पोलीसात धाव घेतली. पोलीसांनी सचिन विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.