राळेगणसिद्धीत गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने अण्णा हजारे यांची भेट घेतली!

74

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रत्यक्ष भेटणे व त्यांच्याशी दोन शब्द बोलणे, असे प्रत्येकाला मनोमन वाटत असते…राळेगणसिद्धी  या गावाचा अण्णांनी केलेला कायापालट प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणे व अण्णांचे मार्गदर्शन घेणे यासाठी गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने राळेगणसिद्धी गाठली. झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या अण्णांची दोन दिवस अगोदर रितसर परवानगी घेऊन या ग्रुपने अण्णांशी सविस्तर चर्चा केली.

शाम कुंभार यांनी निसर्गप्रेमी ग्रुपने आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती अण्णांना दिली. यामध्ये जलसंधारण मोहीम, पाणी अडवा,पाणी जिरवा, वृक्षारोपण, गडकिल्ल्यावरील प्लास्टिक मुक्ती अभियान याबद्धल ग्रुपने केलेल्या कामाची माहिती दिली.

यावेळी अण्णांनी सगळ्यांचे कौतुक करून शाबासकी दिली. पुढेही असेच कार्य आपआपल्या गावापर्यंत पोहचवा, असे मोलाचे मार्गदर्शनही केले. अण्णा करत असलेले समाजकार्य त्यांना मिळालेले पुरस्कार ट्रॉफीज बघून ग्रुपचे सदस्य भारावून गेले व आदराने सर्वजण नतमस्तक झाले.अण्णासोबतच्या आठवणी मनात साठवून आपण यातील कणभर तरी कार्य आपल्या गावात आपल्या संस्थेत करूया हा संकल्प करून या ग्रुपने राळेगणसिद्धी व अण्णांचा निरोप घेतला.

यावेळी शाम कुंभार, राजू आढाव, रमेश दातीर, काळूराम कुंभार, नारायण माने, अशोक संकपाळ, राजू ढोले, सुनील जाधव, बबन जाधव, संजय खोत, महेश शेटे व विशाल आदी उपस्थित होते.