राम- लक्ष्मण आमदार जोडिची राजकीय कारकीर्द नवोदितांसाठी आदर्श ! – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन – पुढच्या वेळी मावळ, शिरुर लोकसभेत कमळ फुलवणार – आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचा पक्षातर्फे गौरव

27

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना हरवणे सोपे नाही. महापालिका झाली, विधानसभा झाली आता लोकसभा शिल्लक आहे. पुढल्यावेळी करून टाकू, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदारसंघात कमळ फुलविण्याचा इरादा शनिवारी (दि. २४) स्पष्ट केला.
भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आपलं राजकीय स्थान एवढं भक्कम करून ठेवलं आहे, की त्यांना हरवणं आता कोणालाही शक्य नाही. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे ‘हरणं मला माहीत नाही’, हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी ठासून भरलेला आहे. आगामी राजकीय जीवनात कितीही कठोर अडथळे आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची त्यांची भूमिका इतरांना आदर्श घालून देणारी ठरेल, अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीचे कौतुक केले.

चालू पंचवार्षिकच्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विजयाला आज (दि.२४) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार लांडगे आणि आमदार जगताप यांचा पिंपळे सौदागर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे, महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, महिला अध्यक्षा उज्वला गावडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व समित्यांचे सभापती, सर्व प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व मंडलाध्यक्ष, पक्षाचे प्रदेशाचे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

तळागाळातील कार्यकर्त्यांमुळेच राजकीय यश : आमदार लांडगे
आमदार लांडगे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची सुरूवातच मुळात ‘भारत माता की जय’ या घोषवाक्याने होते. देशाप्रती असलेलं प्रेम आणि समाजाप्रती असलेली वैचारिक बांधिलकी जपण्याचे प्रमाणिक कार्य भाजपात होते. त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीसोबत एका वैचारिक प्रवाहात असल्याचे समाधान वाटते. मला इथपर्यंत पोहोचविण्यात माझ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. 2014 नंतर भोसरीतल्या नगरसेवकांनी केलेल्या कामामुळेच 2019 च्या निवडणुकीत माझं मताधिक्य वाढलं. हे योगदान भोसरीतल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे आणि कार्यकर्त्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून दिले आहे. याची जाणिव मला माझे वडिल वारंवार करून देतात. मी केवळ लांडगे परिवारातला नसून समाज हाच माझा परिवार असल्याची आठवण मला वडिल करून देतात. हीच भावना मनाशी बाळगून मी 24 घंटे समाजाप्रती बांधिलकी जपण्याचे काम करत असतो, अशी भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांमुळेच चार निवडणुका जिंकलो: आमदार जगताप
आमदार जगताप म्हणाले की, हा सत्कार आमचा नसून आमच्या यशात मोलाचे योगदान देणा-या भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्यामुळेच माझी राजकीय वाटचाल गेली 35 वर्षे यशाच्या शिखरावर अभिमानाने डोलत राहिली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच आमदारकीच्या चार निवडणुका जिंकलो. दरम्यान, एक लोकसभेची निवडणुक हरलो. आता निवडणूक हरण्याचा अनुभवही घेतला आहे. त्यामुळे हरण्याचे भय मनातून कायमचे दूर झाले आहे. भारतीय जनता पार्टीने मला साथ दिल्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता राजकीय क्षेत्रात जिवंत राहू शकला. पत्नी, भाऊ आणि कुटुंबातील सर्व सद्स्य खंबीरपणे पाठिशी उभे राहिले. म्हणूनच आज मी या व्यासपीठावर उपस्थित आहे. कार्यकर्त्यांनी वेळेचं नियोजन करून लोकांना जोडण्याचे काम करावे, असा सल्लाही जगताप यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. तर सरचिटणीस विजय फुगे यांनी आभार मानले.

WhatsAppShare