राम मंदिर भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राऊतांनी व्यक्त केला संताप म्हणाले, ‘मोहन भागवतांनी…’

170

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप आम आदमी पार्टीने पुरावे सादर करत केला आहे. केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी? का? कशासाठी केली आणि या हा व्यवहाराला मंजुरी तरी कशी मिळाली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा समोर आल्याने ट्रस्टच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केल जात आहेत. अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्याने मोठा वाद निर्माण झाला असून देशभर या घोटाळा प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. १० मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्रस्टकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून दुसरीकडे सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंबंधी भाष्य करत संताप व्यक्त केला आहे. तसंच याबाबत ट्रस्टसह सरसंघचालक मोहन भागवत यांनीही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान संजय राऊत म्हणाले कि, “आपचे खासदार संजय सिंग यांनी माझ्याशी फोनवरुन चर्चा करुन माहिती दिली. प्रभू श्रीराम आणि अयोध्या आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. काही जणांनी त्याचं राजकारण केलं असेल पण आम्ही नाही. ट्रस्टचे सर्व सदस्य भाजपाच्या. सरकारच्या वतीने नेमण्यात आले आहेत. आमच्यासारख्या संघटनेचाही सदस्य असावा असं आम्ही सांगत होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो तेव्हा राम मंदिराचं काम सुरु होतं. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी आपल्यातर्फे एक कोटींची रक्कम दिली होती. राम मंदिराच्या नावे देशभरातून निधी गोळा करण्यात आला. संपूर्ण जगातून शेकडो कोटींचा निधी राम मंदिरासाठी लोकांनी दिला आहे. प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा झाला नाही पाहिजे. पण जे जमिनीचं प्रकरण समोर आलं आहे त्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही,” असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

संजय म्हणाले कि, “माझ्याकडे जी माहिती आली आहे त्यातून गडबड असल्याचं दिसत आहे. जर हा घोटाळा झाला असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी सर्वांसमोर येऊन शंका दूर केली पाहिजे. सरकारच्या वतीने तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा. विश्व हिंदू परिषेदच्या नेत्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे. अयोध्येसाठी लढा देणाऱ्या आमच्यासारख्यांना नेमकं काय झालं आहे हे कळणं गरजेचं आहे. संजय सिंग यांनी जे पुरावे समोर आणले आहेत ते धक्कादायक आहेत. भुमीपूजन झालं तेव्हा मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ देखील होते. त्यामुळे योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनीही जे समोर आलं आहे त्यात तथ्य आहे की नाही हे जनतेला सांगावं,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.