राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा; मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी

588

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुंबई महापालिकेने उच्च न्यायालायाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गणेशोत्सवावरुन सुरु असलेल्या वादावर पोस्टरबाजी करत शिवेसनेवर हल्लाबोल केला आहे. अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा असा टोला मनसेने मारला आहे. शिवसेना भवनसमोर हे पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्यासंबंधी वक्तव्य केले होते.

दरम्यान याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा सवाल विचारत गणेश मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करावा असे सांगितले होते.

गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली ६० ते ७० वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच याबाबत तक्रार आली, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो. त्यासाठी का आडकाठी केली जाते असा प्रश्न विचारत राज ठाकरे पुढे म्हणाले होते की, मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन राज यांनी गणेशोत्सव मंडळांना केले होते.