राम कदम यांनी माफी मागितल्याशिवाय मराठवाड्यात पाऊल ठेवलेत तर चपलेने हाणू – स्वाती नखाते पाटील

1560

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – ज्यांच्यात कोणताही दम नाही अशा भाजपाच्या राम कदम यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केला आहे. मुली पळवण्याची भाषा हे खुले आम करतात त्यांना सत्तेचा माज आला आहे. तुम्ही एखाद्या मुलीला हात लावून दाखवा तिने तुम्हाला पळवून पळवून हाणले नाही तर याद राखा असा इशाराच मराठवाड्यातील अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी दिला आहे. एवढेच नाही तर माफी मागितल्याशिवाय मराठवाड्यात पाऊल ठेवलेत तर तुम्हाला चपलेने हाणू असा इशाराही स्वाती नखाते पाटील यांनी दिला. स्वाती नखाते पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांनी एक पाच मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी भाजपाचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला. जोपर्यंत महाराष्ट्रातील महिलांची माफी मागणार नाही तोपर्यंत मराठवाड्यात फिरकू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुमच्यासारख्या जबाबदार माणसाने मुलींबाबत स्त्रियांबाबत असे वक्तव्य करणे तुम्हाला शोभते का?  महिलांबाबत असे बोलण्यास तुमची जीभ धजावतेच कशी? याद राखा महिलांची माफी मागत नाही तोवर तुम्हाला मराठवड्यात फिरकू देणार नाही. हिंमत असेल तर मराठवाड्यात येऊन दाखवा तुम्हाला इथे पळवून हाणले नाही तर मी माझे नाव बदलेन असाही इशारा स्वाती नखाते पाटील यांनी दिला आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यानंतर त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून टीका होते आहे. विरोधकांनी माझा व्हिडिओ मोडतोड करून पोस्ट केला, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण राम कदम यांनी दिले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.