रामाचे नाव लावणाऱ्या रावणाचे दहन कधी करणार ? – चिन्मय मांडलेकर

892

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी देखील तोंडसुख घेतले आहे. रामाचे नाव लावणाऱ्या रावणांचे दहन कधी करणार आपण? असा मजकूर लिहिलेली एक पोस्ट चिन्मय मांडलेकर यांनी फेसबुकवर टाकली आहे.

या विधानाचा निषेध करत राम कदम यांच्यावर थेट नाव न घेता सोशल मीडियाद्वारे मांडलेकर यांनी टीका केली आहे. ‘मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू’ असे म्हणत राम कदम यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान बेताल विधान केले होते.

राम कदम यांच्या वादग्रस्त विधानावर चिन्मय मांडलेकर यांनी सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवली आहे. यावरून राम कदम यांच्याविरोधात सर्व सामान्यांसह सेलिब्रिटींमध्येही नाराजी असल्याचे दिसून येत आहे. आमदार आणि लोक प्रतिनिधींच्या तोंडातून अशी विधाने येऊ लागली, तर राज्यातील महिला सुरक्षितेसाठी कोणाकडे दाद मागणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.