रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा विडा उचलला होता- अनंत गीते

136

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – ”शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा विडा उचलला होता. मात्र, त्यांनी त्यांच्या मुलाला आमदार करायचे म्हणून माझ्या कार्यालयात येऊन माझी दिलगिरी व्यक्त केली,” असे गुपित आज केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अनंत गीते यांनी उघड केले.

”माझ्यावर आली तशी वेळ कुणा शिवसैनिकावर येऊ नये,” असे काम करण्याचे आवाहन गीतेंनी केले. ते औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन कार्यक्रमात बोलत होते.

व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, महिला अध्यक्ष मनीषा कायंदेसह आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

”लोकसभा निवडणुकीत मी कमी मताने निवडून आलो. माझी पीछेहाट का झाली तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाविरोधात लढलो. इतकेच नाही, तर स्वकियांसोबत म्हणजेच रामदास कदम यांच्यासोबतही लढलो. त्यांनी मला पाडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मी विजयी झालो. त्यांनी माझी दिलगिरी व्यक्त केली, कारण त्यांच्या मुलाला आमदार करायचे होते. तसा प्रसंग महाराष्ट्रात कुणाच्याही नशिबी येऊ नये एवढीच अपेक्षा आहे,” असे गीते म्हणाले.