रामदास कदम जादूटोणावाले बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात – सूर्यकांत दळवी

0
523

मुंबई, दि.१० (पीसीबी) – येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. अशातच आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. शिवसेनेचे दापोली विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम हे भगत आणि जादूटोणावाले असून ते बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरत असल्याचे ते म्हणाले. विरोधीपक्ष नेतेपदासाठी कदम यांनी आमच्यासोबत भगत पाठवला होता, असंही त्यांनी सांगितलं.

रामदास कदम हे भगत आणि जादूटोणावाले असून ते दर अमावस्येला भगतगिरी करत असत. ते आपल्यासोबत बंगाली बाबांना घेऊन फिरतात. त्यांनी विरोधीपक्ष नेता बनण्यासाठी आमच्यासोबत भगत पाठवला होता, असा गंभीर आरोप दळवी यांनी केला. तसंच कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, असंही ते म्हणाले. या मतदारसंघात पक्षासाठी योगदान देणाराच उमेदवार हवा. कदम यांनी पराभव झालेल्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, असं दळवी यांनी स्पष्ट केलं.

कदम यांनी पक्षाच्या विरोधातही काम केलं असून त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा दळवी यांनी केला. यावर कदम यांनीदेखील स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या ठिकाणाहून दळवी आमदार होते, त्या ठिकाणाहून आपला मुलगा निवडणूक लढवत आहे. त्या माध्यमातूनच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर मी १०  कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांच्याकडून आपल्या बदनामीचा आणि आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.