रामदास आठवलेंच्या आयुष्यावर होणार चित्रपटाची निर्मिती

95

मुंबई, दि.७ (पीसीबी) – ‘सैराट’, ‘फॅँड्री’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची शक्यता आहे. हा चित्रपट म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आयुष्याची कहाणी असेल, असे म्हटले जात आहे.

वाईटावर विजय मिळवणे, दलितांवरील अॅट्रॅासिटीविरोधात लढणारा आणि एक प्रभावी नेतृत्व म्हणुन सर्वांसमोर येणाऱ्या एका व्यक्तीचा प्रवास ‘पॅँथर’मध्ये दिसणार आहे. लढा, आंदोलन, जबाबदारी, शांतता यांचे मिश्रण या चित्रपटात दिसेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मिळालेले यश या सिनेमातून अधोरेखित होणार आहे.

‘हा फक्त माझ्या एकट्याचा आयुष्यपट नाही. दलितांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. पॅँथर चित्रपटाचा नायक बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर तो चालतो. दलितांच्या हक्ककांसाठी लढतो. चित्रपटातून भारतीयांच्या विचारांना दिशा मिळेल’ अशा आशा आठवलेंनी व्यक्त केली.

नागराज मंजुळे यांच्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यासाठी बोलणी सुरु आहे. राकेश टाक निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. ‘हा फक्त राजकीय-सामाजिक चित्रपट नसेल, तर मनोरंजनात्मक सिनेमा असेल. ‘सैराट’ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बातचित सुरु आहे’ असे टाक यांनी सांगितले.