राफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

124

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – केंद्र सरकारने राफेल विमान खरेदीचा करार करताना ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. हा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. त्याचबरोबर राज्यातील फडणवीस सरकार जुमलेबाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकासदर घसरला आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

पिंपरी- चिंचवड शहर आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज (रविवारी) तळवडे (निघोजे) येथे सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.  या शिबिराचे उदघाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चव्हाण बोलत होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वॉलस्ट्रीट जर्नलने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, २०१८ या वर्षात भारतीय चलनाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सतत घसरत  आहे. गेल्या चार वर्षांत ४८ हजार कोटींची गुंतवणूक देशाबाहेर गेली आहे. प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची थकीत कर्जे वाढत चालली आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

युपीएच्या कार्यकाळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ४७ होती. आता ७३ रुपयांवर आली आहे. रुपयाचा हा निचांक आहे. भारतीय चलनाची किंमत घटल्यामुळे आयात महाग झाली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही वारेमाप वाढ झाली आहे. युपीएच्या सत्ताकाळात आयात आणि व्हॅट २५ टक्के होता. तो आता ३९ टक्के आकारला जातो. मोदी सरकारने साडेचार वर्षाच्या काळात २१ लाख कोटींपेक्षा अधिक कर जमा केला. मात्र, जनतेला अच्छे दिन पहायला मिळाले नाहीत, अशी टीका चव्हाण यांनी केली.