राफेल करारावर राहुल गांधींचा आरोप म्हणजे पोरखेळ – अरूण जेटली

91

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावर केलेला आरोप म्हणजे बालवाडी किंवा प्राथमिक शाळेतील पोरखेळ आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. प्रदीर्घ उपचारानंतर कामावर रुजू झालेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज ( बुधवारी)  एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. 

यावेळी ते म्हणाले की,  राहुल गांधी यांना राफेल करारातील दराबाबत संभ्रम आहे. त्यांनी सात वेळा वेगवेगळी किंमत सांगितली होती. मी एका विमानासाठी ५०० कोटी रुपये देत होतो आणि तुम्ही १६०० कोटी रुपये देत आहात, असा त्यांचा आरोप आहे. पण यावरुन त्यांना किती माहिती आहे हे समजते,  असा टोला जेटली यांना राहुल गांधींना लगावला.

राहुल गांधी यांना कराराबाबत किती माहित आहे आणि ते कधी माहिती करुन घेतील याचे उत्तर त्यांनी द्यावे. साध्या विमानाच्या किंमतीची तुलना तुम्ही लढाऊ विमानाशी कराल का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला. काँग्रेसने राफेल करारासाठी १० वर्षे का लावली याचे उत्तर द्यावे, तुम्ही राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली, असा आरोप जेटली यांनी केला.