रात्री साडेबाराच्या सुमारास घरासमोर शतपावली करत होता; पण अचानक….

154

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – रात्रीच्यावेळी घराजवळ शतपावली करत असलेल्या तरुणाला दोघांनी मिळून दमदाटी आणि मारहाण करत लुटले. त्यानंतर तरुणाच्या गाडीची तोडफोड करून 12 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली.

भावेश रमेश सवानी (वय 22, रा. संत तुकाराम नगर, दिघी रोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक उर्फ बच्चा कांबळे (वय 20), प्रणव बाळासाहेब गवळी (वय 21, दोघे रा. भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर शतपावली करत होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या ओळखीचे दोन्ही आरोपी त्यांच्यासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करत फिर्यादी यांना दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करून बळजबरीने त्यांच्या शर्टाच्या खिशातून एक हजार तीनशे रुपये काढून घेतले. रस्त्यावर पडलेले सिमेंटचे ब्लॉक फिर्यादी यांच्या गाडीवर मारुन सुमारे 12 हजार रुपयांचे नुकसान केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare