राणा दांम्पत्याची उध्दव ठाकरें विरोधात गरळ

60

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट केलेल्या आणि पुढे त्यावरुनच तुरुंगात गेलेल्या राणा दाम्पत्याने नवी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी दिल्लीतील कॅनोट प्लेस येथील संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचा पुनरुच्चार देखील नवनीत राणा यांनी केला.

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आणि लीलावती रुग्णालयातील उपचारानंतर राणा दाम्पत्याने राजधानी नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. दोन दिवस विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांनी आज दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप यावेळी राणा दाम्पत्याने केला.

नवनीत राणा म्हणाल्या, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरुन निवडणूक लढतील काय? हा माझा त्यांना सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी १४ तारखेच्या मुंबईच्या सभेत माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ते जर निवडणूक लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून लढणार, याचंही उत्तर त्यांनी द्यावं. ज्यांनी आपली विचारधारा सोडलेली आहे, अशा उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी मी दिल्लीत असणार आहे. १४ तारखेला सकाळीच आम्ही दिल्लीतील कॅनोट प्लेसला संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आम्ही आरती करणार आहोत. हे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, ते दूर झालं पाहिजे, अशी मागणी आम्ही हनुमानाचरणी करणार आहोत”.

“बाळासाहेबांनी मृत्यूपर्यंत एकही निवडणूक लढली नाही. त्यांना पदाची लालसा नव्हती. तर तुम्हाला पदाची लालसा आहे तर तुम्ही निवडणूक लढा. हे मात्र नक्की की मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणार, फक्त १४ तारखेच्या सभेत कोणत्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढणार हे स्पष्ट करा, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.