राज ठाकरे माफी मागा अन्यथा – भाजपा प्रवक्त्याचा इशारा

146

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून तीव्र विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी या दौऱ्याला कडाडून विरोध केलाय. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीकाही केलीय.
उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागीतल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशमध्ये घुसूही दिलं जाणार नाही, अशी बृजभूषण यांची भूमिका आहे. राज यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी त्यांनी नंदिनी इथं उत्तर प्रदेशातील साधुसंत आणि नागरिक यांच्याशी बैठक आयोजित केली होती. दरम्यान, आता भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यानंतर मुंबई भाजपा प्रवक्ते संजय ठाकूर यांनीही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केलाय.

याआधी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळं राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर अयोध्या दौरा करावा, असं ठाकुरांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी माफी मागितली तर मी लखनऊ विमानतळावर येऊन शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह त्यांना सुरक्षित अयोध्येत घेऊन जाईन. तसंच राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर आमचा या दौऱ्याला विरोध असणार असल्याचा इशारा संजय ठाकूर यांनी दिलाय. परप्रांतीय फेरीवाले, टॅक्सीवाले, मजुरांची माफी मागावी, असंही संजय ठाकुरांनी राज ठाकरेंना पत्रात सांगितलंय.