राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचे व्यंगचित्रातून प्रत्युत्तर

453

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीवर भाष्य करणारे एक व्यंगचित्र रेखाटले होते. या व्यंगचित्राला उत्तर देण्यासाठी  भाजप समर्थकाने एक व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. यात अमित शहा यांच्या जागी शरद पवार तर उद्धव ठाकरे यांच्या जागी राज ठाकरे यांना दाखवले आहे. सत्तेसाठी मन की बात असेच या व्यंगचित्राला नांव देण्यात आले आहे.

शरद पवार आणि राज ठाकरे एकमेकांची भेट घेत आहेत आणि दोघांच्याही दुसऱ्या हाती खंजीर आहे, असे दाखवण्यात आले आहे. पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ या फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यांचेच व्यंगचित्र त्यांच्याच गळ्यात असा मथळा देऊन हे व्यंगचित्र या पेजवर पोस्ट केले आहे.

पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ हे अधिकृत फेसबुक पेज नाही. मात्र, या पेजचा उद्देश भाजपला समर्थन देणे हाच आहे त्यामुळे या पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न या पोस्टमधून केला आहे. यावर राज ठाकरेंची काय प्रतिक्रिया येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.