राज ठाकरेंचे पुन्हा व्यंगचित्रातून सत्ताधाऱ्यांवर फटकारे

417

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावर व्यंगचित्रातून सत्ताधाऱ्यांवर फटकारे मारले आहेत. याच  व्यंगचित्रातून मोदींच्या फिटनेस चॅलेंजवर मार्मिक टिप्पणी केली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. 

शरद पवारांनी पुण्यात पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी घालण्याचे आवाहन केल्यानंतर, अनेकांनी या घटनेला जातीपातीच्या राजकारणाची उपमा देत टीका केली. तसेच, जामनेरमधील मारहाणीमुळेही जातीय द्वेषाची घटना उघडकीस आली होती. या घटनांचा धागा पकडत राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले आहे.

या व्यंगचित्रात एक विस्तीर्ण झाड दाखवण्यात आले आहे. या झाडाला ‘महाराष्ट्र’ असे नाव दिले आहे. या झाडाला वेलींनी घेरले आहे. या वेलींवर ‘जातीपातीचे विष’ असे लिहिले आहे. झाडाच्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस उभे असून, तिथे बाजूलाच असलेला ‘मराठी’ माणूस मुख्यमंत्र्यांना झाडाच्या विषारी वेली छाटण्याची विनंती करत आहे. दरम्यान, या व्यंगचित्रावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.