राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण लवकरच देणार- गिरीश बापट

141

पुणे, दि. २ (पीसीबी) – मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसाचारीचे गालबोट लागले आहे. यावर बोलताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, तसेच मागास आयोगाचा अहवाल आल्यावर तात्काळ मराठा समाजाचा आरक्षणासाठी खास अधिवेशन घेतले जाईल आणि त्याचा अहवाल केंद्राला पाठवला जाईल. अशी ग्वाही गिरीश बापट यांनी आज पुण्यात दिली. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण लवकरच देणार आहे. मराठा समाजाशिवाय धनगर आणि मुस्लिम समाजाला देखील सरकार न्याय देणार असल्याचे यावेळी बापट यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या ऑफिससमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांना आंदोलन कर्त्यांनी निवेदन देखील दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.