राज्यात लवकरच भरती प्रक्रिया, १५ हजार जागा भरणार…

56

इंदापूर, दि. २६(पीसीबी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यात लवकरच भरती प्रक्रिया सुरु करून १५ हजार जागा भरणार आहे. असे आश्वासन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.इंदापूर येथे अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता.२५) करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वारील आश्वासन दिले आहे. यावेळी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेंडगे, महेश बडे, किरण निंभोरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या प्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे. तशीच मलाही आहे. एमपीएससी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या असल्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, “कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.