राज्यात मान्सूनचे २ दिवस आधीच आगमन

83

मुंबई, दि.८ (पीसीबी) – नैऋत्य मोसमी पावसाचे आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. हा मोसमी पाऊस येत्या २४ तासांतच मुंबईत दाखल होणार आहे. कोकणासह मुंबईत गेले दोन दिवस पूर्व मोसमी पावसाने आधीच वातावरण आल्हाददायक केले आहे. आता मान्सूनने वर्दी देत त्यात भरच घातली आहे.

यंदा मान्सूनचे आगमन राज्यात दोन दिवस अगोदर झाले आहे. सर्वसाधारणपणे १० जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. पुढील चार महिने त्याची कृपादृष्टी राहते. आपल्या आगमनाची वर्दी यंदा मान्सून चांगलीच वाजतगाजत देणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच ९ आणि १० जून रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ८ ते १२ जून या पाचही दिवशी मच्छीमारांना कोकण आणि गोवा किनारपट्टीवर अरबी समुद्रात मध्य पूर्वेकडे न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

पश्चिम किनारपट्टीवर ८ ते १२ जून दरम्यान वाऱ्यांचा वेग ४० ते ६० किमी प्रतितास असणार आहे. मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक, गोव्याहून पुढे सरकत आज मान्सूनने महाराष्ट्राचा दक्षिण भाग व्यापला आहे. येथून पुढे मान्सून तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टीवरून पुढे सरकत राहील.