राज्यात बहुतांश ठिकाणी इंटरनेट सेवा बंद

23

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  सकल मराठा समाज मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) क्रांती दिनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सोलापूर आणि नागपुरात टायर जाळण्यात आले. तऱ अहमदनगर मध्ये महामार्ग रोखण्यात आला आहे.  बारामतीत शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून  राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पंढरपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही काही मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुण्यातही इंटरनेट सेवा बंद केली आहे.   सुरक्षेच्या दृष्टीने शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर या तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे.

नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली  आहे. दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले आहे.  सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद जाहीर करण्यात आला आहे. २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत आज  बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.