राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ

396

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – केरळात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, यवतमाळ, धुळे, अकोला या जिल्ह्यातील काही भागांत पावासाने अक्षरशा: धुमाकूळ घातला आहे. तर गोंदियातही अनेक जिलह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

नंदुरबार जिलह्यातील नवापूर तालुक्यात पावसाने ५ जणांचा मृत्यू झाला. तर सहाजण बेपत्ता आहेत. सध्या परिसरातील तब्बल ३०० च्यावर घरांची पडझड झाली आहे. तसेच ६० जनावरे देखील दगावली आहेत.

गेल्या ४८ तासांत अकोला जिल्ह्यात या मोसमातला सर्वाधिक पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे.

दिग्रस तालुक्यातील धानोरा येथील बाजीराव डेरे आणि उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील अंकूश साबळे हे दोन तरूण पुरात वाहून गेले आहे.

चंद्रपूरमध्ये कोरपना तालुक्यातील अंतरगाव या गावाला पुराच्या पाण्याने विळखा दिला आहे. सध्या अंतरगावकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने लोकांचा देखील संपर्क खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी गावात आणि शेतात घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

धुळे जिल्ह्यात शुक्रवारच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे लोंढा नदीला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. तर एक बैल गाडी वाहून गेली आहे.