राज्यसभेसाठी रजनी पाटी यांना उमेदवारी

90

मुंबई, दि. २० (पीसीबी) : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं उमेदवाराची घोषणा केलीय. रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राजीव सातव यांच्या निधनानं एक जागा रिक्त झाली होती, त्यांच्या जागेवर आता रजनी पाटील निवडणूक लढवतील. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. त्या आधीही राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. विशेष म्हणजे विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव आहे. तो निर्णय़ अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली गेलीय. विशेष म्हणजे आज सकाळीच भाजपानं राज्यसभेच्या एका जागेची निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. त्यात संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आलीय.

कोण आहेत रजनी पाटील?
रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.
जेव्हा रजनी पाटलांनी राहुल गांधींना सुनावलं

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे जम्मूच्या दौऱ्यावर होते. ह्या दौऱ्यात रजनी पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं. राहुल गांधी व्यासपीठावर होते. रजनी पाटलांनी राहुल गांधींना तोंडावर काँग्रेसमध्ये नेमकं काय कमी आहे ते सांगितलं होतं. रजनी पाटील म्हणाल्या होत्या. ‘सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे काँग्रेसचे शिपाई तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहेत. ती लढाईची ताकद दाखवण्यासाठीच ते इथं आलेत. तुम्ही मला इथं पाठवलत, सोनियाजींनी मला इथं पाठवलं. तर मी एकच गोष्ट आज इथं सांगू इच्छिते, काँग्रेस पार्टीनं खूप जणांना मोठं केलं. आम्ही सगळे इथं पदाधिकारी बसलेले आहोत. मंत्री राहीलेले बसलेत, केंद्रीय मंत्री झालेलेही आहेत इथं. आम्हाला ताकद देण्याचं काम काँग्रेस पार्टीनं केलं. आम्ही ज्यावेळेस म्हणतो की, आम्ही मोठे आहोत तर ती ताकद आम्हाला काँग्रेस पार्टीनं दिलीय. पण हा समोर बसलेले जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना कुणीच ताकद दिली नाही. त्यांना बळ देण्याची गरज आहे. त्यांना तादक द्यायला तुम्ही आम्हाला सांगता पण ते कुणीच देत नाही, तुम्हीही देत नाहीत. आणि हिच पार्टीची सर्वात मोठी कमजोरी आहे’.

राजीव सातव यांच्या निधनानं जागा रिक्त
काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

भाजपकडून संजय उपाध्याय
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.

WhatsAppShare