राज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा  वापर नको – सर्वोच्च न्यायालय   

109

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – राज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर करता येणार  नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) दिला आहे.  गुजरात काँग्रेसचे मुख्य प्रतोद  शैलेश मनुभाई परमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. काँग्रेसबरोबरच एनडीए सरकारनेही राज्यसभा निवडणुकीत नोटा ला विरोध केला होता.

न्यायालयात  याबाबतची सुनावणी ३० जुलैला पूर्ण करण्यात आली  होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. निवडणूक आयोगाने म्हटले होते की,  न्यायालयाच्या आदेशानुसारच राज्यसभा निवडणुकीत नोटा चा वापर केला होता. २०१३ मध्ये न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत याचा वापर सुरू केला होता, असे सांगितले जात होते.

२०१३ च्या आदेशात न्यायालयाने म्हटले होते की, मतदाराला ज्याप्रमाणे मत देण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे त्याला कोणालाही मत न देण्याचाही अधिकार आहे. सर्व प्रकारच्या निवडणुकींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हा आदेश लागू करण्यात येणार  होता. राज्यसभा निवडणूक प्रक्रिया आधीच गुंतागुंतीची  आहे, त्यामुळे त्या प्रक्रियेला अधिक कठीण  का बनवायचे, असे न्यायालयाने म्हटले.