राज्यसभा उपसभापती निवडणूक : काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद असणार विरोधकांचे उमेदवार

161

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी भाजपप्रणीत ‘रालोआ’चा उमेदवार म्हणून जनता दल (संयुक्त) चे खासदार हरिवंश नारायण सिंह यांचे नाव निश्चित झाले आहे. तर विरोधीपक्षांकडून काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद हे उमेदवार असतील असे सुत्रांकडून कळते.

सत्ताधारी रालोआचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरही विरोधकांचा उमेदवार कोण याबाबतची मंगळवारी अनिश्चितता कायम होती. यासाठी विरोधीपक्षांपैकी राष्ट्रवादी की काँग्रेसचा उमेदवार असेल याबाबतही एकमत होत नव्हते. राष्ट्रवादीच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचे नावही उपसभापतीपदासाठी चर्चेत होते. मात्र, आताच्या ताज्या माहितीनुसार या पदासाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्याचे कळते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यातून माघार घेतली असून विरोधकांनी एकमताने काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.