राज्यभर दूधकोंडी; पुण्यात गाड्या फोडल्या

67

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासूनच दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. अमरावतीत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी दूधाचा टँकर पेटवण्याचा प्रयत्न केला. तर कोल्हापुरात पुणे-बेंगळुरू महामार्गावर टँकर फोडून रस्त्यावर दूध ओतले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मध्यरात्रीच पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. तर अमरावतीत दूधाचा टँकर पेटवण्याचा प्रयत्न केला. पुण्यातही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुण्यातील आंबेगाव येथील गोवर्धन दूध संघाचा टँकर फोडून दूध रस्त्यावर फेकून दिले. संगमनेर येथून औरंगाबादला जाणारा टेम्पो हडस पिंपळगाव येथे फोडला. त्यानंतर टेम्पोतील दुधाचे कॅरेट रस्त्यावर फेकून दिले. माढा येथेही कार्यकर्त्यांनी दूध बंद आंदोलन केले. वरवंड टोलनाक्यावर टँकरमधील दूध रस्त्यावर ओतले. सांगोल्यामध्ये महूद येथे दूध ओतून आंदोलन केले. पुण्यात दुधाच्या पाच गाड्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. दरम्यान, गोकुळ दूध संघाने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संघाकडून आज दूध संकलन बंद राहणार आहे. तर नगरमध्येही दूध संकलन आणि वितरण बंद राहणार आहे. या आंदोलनामुळे राजहंस, प्रभात यांनी दूध संकलन आणि वितरण न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सरकारने शहरांमधील दूध पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी उपाययोजना केली असून, वेळ पडली तर पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर आणण्यात येतील,’ असे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.