राज्यभरात मातंग समाजावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अमित गोरखेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

113

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – राज्यातील वेगवेगळ्या भागात गेल्या काही दिवसांपासून मातंग समाजातील नागरिकांवर अन्याय, अत्याचार होत असून समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी संबंधित विभागाला कडक निर्देश देण्याची मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

अमित गोरखे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांची मातंग समाजातील नागरिकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळासह भेट घेऊन राज्यभरात मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत निवेदन दिले होते. यावेळी सचिन आरोटे, नितीन दिनकर, चंद्रकांत काळोखे, आनंद खंडागळे, भारत पवार, बालाजी गवारे, भानुदास नेटके, प्रवीण मिसाळ, अमोल कुचेकर, शेखर साळवे, विनायक मोहिते, विलास शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्याच्या वेगेवेगळ्या भागात मातंग समाजावर अन्याय, अत्याचार होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील घटना असेल किंवा आळंदी येथील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या असेल. अशा घटनांमुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांचा समाजाकडून निषेध होत असला, तरी त्यांना आळा घालण्यासाठी अन्याय करणाऱ्यावर  कडक  कारवाईची होणे गरजेचे आहे. त्यासाठी अमित गोरखे व शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात कोठेही मातंग समाजावर अन्याय झाला असल्यास भविष्यात हा अन्याय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.