राज्यभरातील गणपतीसह कलाकारांच्या घरच्या गणरायांचे घ्या दर्शन

270

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक असणाऱ्या गणेशोत्सवाला आज (गुरुवारी) गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली. अनेकांनी आज अगदी वाजत गाजत गणरायांचे आपल्या घरी स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, फुलांची आरास, मोदकाचा नैवेद्य अशा थाटात गणपती बाप्पांचे जंगी स्वागत करण्यात आले. अगदी आगत्याने गणरायांचे स्वागत करणाऱ्यांमध्ये अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीज सर्वांचाच समावेश आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास वेळ राखून ठेवत गणपती बाप्पांचे स्वागत केले आहे.

अनेक बडे कलाकार आता पुढील काही दिवस बाप्पांच्या सेवेतच वेळ घालवणार आहेत. तर अनेकजण मुंबईमधील बड्या मंडळांमध्ये जाऊन गणरायांचे दर्शन घेतील. आज दिवसभर अनेक सिलेब्रिटीजने गणपतींचे अगदी सोशल मिडियावरूनही स्वागत केले. काहींनी केवळ गणपती बाप्पा मोरयाची हाक दिली तर काहींनी घरातील गणरायांबरोबर सेल्फी पोस्ट करत आपल्या चाहत्यांना फोटोच्या माध्यमातून घरच्या गणेशाचे दर्शन घडवले.

यामध्ये रितेश देशमुख, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, दिपीका पादुकोण, पल्लवी सुभाष, अमृता खानविलकर, तुषार कपूर, माधुरी दिक्षित, सनी देओलन अनिल कपूर, किर्ती सेनॉन, त्याचबरोबर कार्तिक आर्यन, सई ताम्हणकर, दक्षिणेतील अभिनेता सिद्धार्थ या सेलिब्रिटींबरोबरच शिल्पा शेट्टी, ऋषी कपूर, नाना पाटेकर यांच्या घरीही गणरायांचे आगमन झाले आहे. एकंदरीतच काय तर सामान्यांबरोबरच सेलिब्रिटीजही गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.