राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर; पंकजा मुंडे देणार विनायक मेटेंना धक्का

1804

बीड, दि. ५ (पीसीबी) – शिवसंग्राम पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना भाजपमध्ये आणण्याची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तयारी सुरू केली आहे. पंकजा मुंडेंच्या या खेळीमुळे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष  विनायक मेटेंना जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राजेंद्र मस्के यांनी पंकजा मुंडेंच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आयोजित केला होता. यावेळी मस्के  यांनी पंकजा मुंडेंची भव्य रॅली काढली. व्यासपीठावरच्या बॅनरसह सगळीकडे पंकजा मुंडेंचे होर्डिंग लावले होते. पंकजा आणि मस्के यांची वाढती जवळीकता बघता मस्के यांना भाजपमध्ये आणून मेटेंना धक्का देण्याची खेळी पंकजा यांनी आखल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी भाषणात मस्केंच्या कामावर पंकजा मुंडेंनी जाहीर स्तुती सुमने उधळली. मस्के यांचे घर माझ्यासाठी लकी आहे. असे सांगून जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर करण्यासाठी त्यांच्याच घरी बैठक झाली होती आणि यापुढेही त्यांच्याच घरी बैठका घेण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी, असे जाहीर करुन टाकले. त्यामळे राजेंद्र मस्के  भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.