राजीव गांधी ‘मॉब लिचिंग’चे जनक; दिल्लीत भाजप नेत्याची फलकबाजी

119

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी)  दिल्लीत ठिकठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ अशा आशयाचे फलक दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी लावले आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीही बग्गा यांनी राजीव गांधी हे मॉब लिचिंगचे जनक आहेत, असा आरोप ट्विटरच्या माध्यमातून केला होता. या प्रकरणी  माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेसने तक्रारदेखील दिली होती. परंतु, आता दिल्लीत ठिकठिकाणी  बग्गा यांनी हे फलकबाजी केल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे.

१९८४ मध्ये राजीव गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दंगली घडून आल्या होत्या. राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे पितामह आहेत. देशात सगळ्यात मोठे मॉब लिंचिंग राजीव गांधी यांनी घडवून आणले होते, असा आरोप बग्गा यांनी केला  होता.

दरम्यान, लंडन दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना १९८४ मध्ये घडलेली शीख हत्याकांड घटना वेदनादायी होती, असे म्हणत काँग्रेसचा यामध्ये सहभाग नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले होते.