राजीनामा देण्यापूर्वी शरद पवारांशी बोलायला हवे होते; तारीक अन्वरांना खंत

193

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणात पंतप्रधान   मोदी यांचे समर्थन केले होते. याबद्दल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त करून तडकाफडकी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता अन्वर यांना आपल्या राजीनाम्यावर खंत वाटत आहे.

पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले तारिक अन्वर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी अन्वर म्हणाले की, शरद पवार यांच्याशी काहीही न बोलता राजीनाम्याचा निर्णय घेतला. परंतु मी राजीनामा देण्यापूर्वी शरद पवारांशी बोलायला हवे होते.

राफेलबाबत पवारांनी विधान केल्यानंतर ते आपली बाजू मांडतील, असे मला वाटत होते. त्यासाठी मी दोन दिवस वाटही बघितली, परंतु पवार यावर काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मी तडकाफडकी राजीनामा दिला. परंतु राजीनामा देण्यापूर्वी मी पवारांशी बोलायला हवे होते,  असे अन्वर  म्हणाले.

दरम्यान, राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असे विधान शरद पवार यांनी केले होते.  यावर पवारांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचे सांगून  तारिक अन्वर  यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.