राजकीय वर्तुळात मोठी खळबळ….गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

73

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.

रुपाणी पत्रकार परिषदे आधी राज्यपालांना भेटले. राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली. रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.

रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

WhatsAppShare